श्री नारायण महाराज हे चिंतामणी महारांजाचे जेष्ठ पुत्र असल्यामुळे, गादीचा वारसा त्यांच्या कडे आला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पण अनेक चमत्कार करून, व लोकांची दु:ख दुर करून, त्यांना भक्तीमार्गात आणि गणेश संप्रदायाकडे वळविले. श्री चिंतामणी महाराजांप्रमाणे श्री नारायण महाराजांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. त्या काळातील अनेक राज्यकर्त्यांना व सरदारांना संस्थानच्या मिळकती मधुन त्यांनी आर्थिक मदत केली व त्यांचे मनोधैर्य वाढविले. त्यामुळे राज्यकर्त्यांनी देखील देव संस्थानला अनेक इनामे दिली. श्री नारायण महाराजांच्या कारकिर्दीत संस्थानला भव्य स्वरुप प्राप्त होऊन, श्री गणेश संप्रदायाची कीर्ती सर्वत्र पसरली.
श्री नारायण महाराज हे राजगुरू होते. राष्ट्र, धर्म यांचा त्यांना कधीच विसर पडला नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभे राहावे यासाठी त्यांनी सर्वतोपरी मदत केली. जिजाबाई बालशिवाजीला घेऊन अनेक वेळा चिंचवडला येत. गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांना गुरु केले. छत्रपतींनी रघुनाथ पंडितांकडून राज्यव्यवहार कोश करवून घेतला त्याच्या सुरवातीलाच पुढील श्लोक आला आहे.
अर्थ : चिंतामणीचा अवतार असणारे, सज्जनांमध्ये श्रेष्ठ असे पवना नदीच्या काठावर चिंचवड गावी वास असलेले, लोकांवर कृपा करणारे, गणेशाच्या उपासनेने जयाने अष्टमहासिद्धि प्राप्त करून घेतल्या आहेत, अशा मनोरथ पूर्ण करणाऱ्या नारायण देवाची मी सतत सेवा करतो. त्याच ग्रंथात आणखी एक श्लोक आहे,
अर्थ : “जो सिद्धी मिळवून देतो अशा हेरंबाच्या (गणपतीच्या) भजनाने, चिंचवड निवासी नारायण नावाच्या अत्यंत बुद्धिमान, श्रेष्ठ महानुभावांकडून शिवसार्वभौमाला अनुग्रह मिळाला.”
ह्यांनी आपले अवतार कार्य इ. स. १७१९ संपविल्यानंतर, जेथे त्यांचे दहन केले त्याठिकाणी श्रीगणपतीची प्रतिमा उमटली आहे व शेजारी पत्नीला दिलेल्या वराप्रमाणे तिची देखील प्रतिमा उमटली आहे.