क्षेत्रमाहात्म्य

chinchwad-home-banner-after-img

श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी

श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर

           श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांचे संजीवन समाधी मंदिर हे दक्षिणवाहिनी पवनानदीच्या तीरावर वसलेले आहे. याठिकाणी श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांनी इ.स. १५६१, मार्गशीर्ष वद्य षष्ठीला संजीवन समाधी घेतली. त्यावेळी त्यांचे वय १८६ वर्षे होते. श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधिस्थ झाल्यावर त्यांचे सुपुत्र श्रीचिंतामणी महाराजांनी श्रीमोरया गोसावींच्या डोक्यावर येईल अशी जागा पाहून समाधीगुंफेच्या वरच्या बाजूला सिद्धिबुद्धीसहित विनायकाची स्थापना केली, त्यास “समाधी विनायक” असे म्हणले जाते. हे समाधिस्थान जागृत आहे. या समाधीवर शके १५८० विलंबी नाम संवत्सरात कार्तिक शुद्ध चतुर्थीस देवालय बांधण्यास सुरुवात झाली. ते बांधकाम पुढील वर्षी आषाढ शुद्ध चतुर्थीस पूर्ण झाले. इंग्रजी तारखांप्रमाणे ह्या मंदिराच्या बांधकामास दि.२७ ऑक्टोबर १६५८ रोजी सुरुवात झाली आणि दि.१३ जून १६५९ रोजी बांधकाम संपूर्ण झाले.
           मंदिराची बांधणी साध्या दगडाची आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर एक सभामंडप लागतो. या प्रशस्त सभामंडपामधून आत गेल्यावर श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांची संजीवन समाधी आहे. समाधीवरची मूर्ती काळ्या पाषाणाने घडवलेली असून अत्यंत सुबक आहे. ही मूर्ती द्विभुज गणपती सिद्धीबुद्धीसहित असून, ती श्री मोरया महाराजांचे सुपुत्र श्रीचिंतामणी महाराजांनी स्थापन केलेली आहे. त्याच्याचखाली श्री मोरया महाराज आजही संजीवन  समाधिस्त आहेत. अर्जुनेश्वराच्या मागे, गाभाऱ्याच्या दाराच्या उजवीकडे एक शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख पाच ओळींचा खोदिव, सुस्पष्ट व वळणदार अक्षरांचा असून सहजपणे वाचता येतो. कार्तिक शुद्ध १२ शके १५८० विलंब संवत्सर या दिवशी देवालयाच्या बांधकामास प्रारंभ झाला व आषाढ शुद्ध ४ (शके १५८१) सोमवार विकारी संवत्सर या दिवशी काम पूर्ण झाले. असे यावर लिहिलेले आहे.  

           बाहेरच्या गर्भगृहात श्री अर्जुनेश्वराची प्रचंड शाळुंका आहे. तेथून मोरया गोसावी महाराजांच्या समाधीकडे जाण्याचा रस्ता आहे. चिंतामणी महाराजांच्या समाधी मंदिराच्या देवळीतून बघितले तर श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या समाधीवरील विनायकाचे दर्शन व्हावे अशी रचना आहे. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधी मंदिर परिसरात, सप्तपुरुषांची समाधी मंदिरे, व आठवी दत्तक श्रीधरणीधर महाराज देव यांची, श्रीविनायक उर्फ काका महाराज देव, श्री दिगंबर महाराज देव  व श्रीकमलाकर महाराज देव यांची समाधी मंदिरे आहेत. वरच्या बाजूला श्रीमोरोबा महाराजांचे वृंदावन आहे. वरच्या देऊळ मळ्यात मोरया गोसावींचे गुरु नयनभारती गोसावी महाराज आणि श्रीविघ्नेश्वर महाराज देव यांच्या समाधी आहेत. सर्व मंदिरे घडीव दगडात बांधलेली आहेत. या मंदिरातील सर्व समाधींचे दर्शन घेतल्याने अष्टविनायक दर्शनाचा एकाच ठिकाणी लाभ होतो. 

           श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर पूर्वाभिमुख असून, दक्षिणवाहिनी पवना नदीच्या तीरावर बांधलेले आहे. मंदिराच्या दक्षिणेस उद्यान असून, उत्तरेस विस्तृत पटांगण आहे. यास देऊळमळा असे देखील म्हणले जाते. या पटांगणात संजीवन समाधी महोत्सव होतो व महाप्रसाद होतो. संजीवन समाधी महोत्सवामध्ये गायन वादनाचे कार्यक्रम होतात तसेच संजीवन समाधी महोत्सवास लाखो लोकांना महाप्रसादाचे वाटप होते.

chinchwad-leave-img-divider
मराठी english