उत्सव

chinchwad-home-banner-after-img

श्री क्षेत्र चिंचवड येथील यात्रा – उत्सव

श्री क्षेत्र चिंचवड येथील माघ यात्रा (गणेश जयंती)

          भाद्रपदी यात्रेप्रमाणेच या यात्रेची सर्व व्यवस्था असते. फक्त यावेळी श्रीमंगलमूर्ती पालखीतून न जाता रथातून जातात. प्रथम थेरगाव रस्त्याने (आता पुणे-मुंबई रस्त्याने) पुण्यापर्यंत जातात व नंतर भाद्रपदी यात्रेप्रमाणे मुक्काम करीत माघ शु. तृतीयेस स्वारी मोरगावी पोहचते. तेथे सर्व विधी यथाक्रम केले जातात.

          माघी यात्रेवेळी परतताना श्रीमंगलमूर्ती थेऊर येथे माघ शु. अष्टमीला श्रीचिंतामणीच्या दर्शनास जातात. तेथे प्रथम धूळभेटीच्या वेळी श्रीमंगलमूर्तीचा डबा बाहेर ठेवून श्रींचे दर्शन घेतात. श्री देव महाराजांना तेथील पुजारी प्रसाद देतात. रात्री धुपारती होते.

          यानंतर देव श्रीसिद्धिविनायकांच्या दर्शनासाठी जातात. दुसऱ्या दिवशी महापूजा आणि प्रसाद झाल्यावर सिद्धटेकला सिद्धिविनायकाची महापूजा, नैवेद्य, प्रसाद,  धुपारती होऊन वाटेत पुणे येथे मुक्काम करुन, द्वादशीला श्रीमंगलमूर्ती  चिंचवडला परत येतात.

श्री क्षेत्र चिंचवड येथील ज्येष्ठ यात्रा (ज्येष्ठी गणेश जन्म)

          भाद्रपदी व माघी यात्रेप्रमाणेच या यात्रेची सर्व व्यवस्था असते. फक्त यावेळी श्रीमंगलमूर्ती पालखीतून न जाता वाहनातून अलिबाग येथील खार-नारंगी येथे जातात. ज्येष्ठ शुद्ध तृतीयेला सकाळी पूजा-नैवेद्य झाल्यानंतर श्रीमंगलमूर्तींची यात्रा चिंचवडहून वाजत-गाजत नारंगीला जाण्यासाठी निघते व नारंगी येथे ग्रामस्थ वाजत-गाजत श्रींचे स्वागत करतात.

          चतुर्थीच्या दिवशी श्रीमंगलमूर्ती व श्रीमोरया गोसावी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात येतो. यावेळी श्रीगणपती अथर्वशीर्षाचे सहस्रावर्तन केले जाते,व सर्व भाविक प्रसादाचा लाभ घेतात. चतुर्थीच्या दिवशी रात्री श्रींसमोर श्री मोरया गोसावी महाराज, श्रीचिंतामणी महाराज देव, श्रीनारायण महाराज देव व श्रीधरणीधर महाराज देव यांनी रचलेल्या पारंपारिक धुपारतीतील पदांचे गायन होते. पंचमीस सर्व ग्रामस्थ व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सर्व भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात.  पंचमीच्या दिवशी श्रीमंगलमूर्ती पुन्हा चिंचवडकडे प्रस्थान करतात.

श्री क्षेत्र चिंचवड येथील श्रावण द्वारयात्रा

          मोरगावप्रमाणेच चिंचवड येथेही द्वारयात्रा करण्याची पद्धत आहे. मोरगावी असणाऱ्या द्वारांची अशंभूत द्वारे चिंचवडला श्रीमोरया गोसावींनी स्थापन केली आहेत. ही द्वारयात्रा श्रावण शुद्ध प्रतिपदा ते चतुर्थी या चार दिवसात असते. चिंचवडगावच्या चार दिशांना (पिंपरी, वाकड, रावेतचा रामाडीचा डोंगर आणि आकुर्डी) चार सीमाद्वारे आहेत. पूर्वेकडे पिंपरी रस्त्यावर मांजराई व रमामहेश दक्षिणेला वाकड रस्त्यावर आसराई व उमा महेश, पश्चिमेला तळेगाव रस्त्यावर ओझराई व रतिकंदर्प आणि उत्तरेला आकुर्डी रस्त्यावर मुक्ताबाई व महीवराह या देवता आहेत. या चार दिवसात चारही दिशांच्या देवतांची उत्सवपूर्वक पूजा केली जाते. 

          प्रतिपदेला प्रथम देऊळवाड्यातील श्रीमंगलमूर्तीची पूजा झाल्यावर श्रीमोरया गोसावींच्या संजीवन समाधीवर पाणी घालून थोडे पाणी लोटीत ठेऊन ते पाणी श्री देव महाराज सोवळ्याने इतरांसह प्रतिपदेला पिंपरी, द्वितीयेला वाकड, तृतीयेला रामाडी डोंगर रावेत व चतुर्थीला आकुर्डी येथे जाऊन तेथील देवतांना घालतात. यावेळी श्रीमोरया गोसावी महाराज यांनी रचलेला देवीचा गोंधळ, जोगवा अशी पदे म्हटली जातात. या यात्रेची छोटी मिरवणूक पांढऱ्या पतकांनिशी चोपरादाराच्या हाती रुप्याची काठी व सोबत छत्रीधारी यांचेसह वाजंत्री वाजवीत निघत असते. सोबत पीतांबरधारी सेवक असतात. पूजा करून चिंचवडच्या सीमेपासून पदे म्हणतात. तेथून वाजत-गाजत समाधीपुढे आल्यावर या यात्रेची सांगता होते. शेवटच्या दिवशी होमहवनाचा विधी होतो. यात्रेत बरोबर असणाऱ्या सर्व भाविकांना प्रसादाचे आमंत्रण असते. परत आल्यावर श्री चिंतामणी महाराज देव (थोरले) यांच्या समाधी मंदिरा समोर धूपारती होते. त्या दिवशी सर्व समाधी मंदिर परिसरातील सर्व देवांना पोषाख घालतात. यानंतर सर्व भक्त श्री मंगलमूर्ती वाडा येथे महाप्रसादाचा लाभ घेतात व ही द्वारयात्रा संपन्न होते.

श्री क्षेत्र चिंचवड येथील भाद्रपद यात्रा

               श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांना श्री मंगलमूर्तींची प्राप्ती झाल्यानंतर ते फक्त भाद्रपद व माघ महिन्यात यात्रा करू लागले. ही यात्रा आजतागायत सुरु आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सकाळी पूजा नैवेद्य झाल्यावर श्रीमंगलमूर्तींची पालखी चिंचवडहून वाजत गाजत मोरगावला जाण्यासाठी निघते. पालखी प्रथम श्रीमोरया गोसावींच्या समाधी मंदिरात येते तेथे त्यांची प्रार्थना करून डाळीचा प्रसाद वाटतात. नंतर सर्व मंडळी गावाबाहेर देवघर सोसायटीजवळ जाऊन उभी राहतात. तेथे पुन्हा डाळीचा प्रसाद वाटला जातो.

          पालखीचा पहिला मुक्काम पुणे येथे होतो. तेथे तळेगावकर दाभाडे यांच्याकडून किनखाबी पताका व पूजासामग्री येत असे. पालखीचा दुसरा मुक्काम सासवड येथे होतो. जेजुरी येथे पूजा-अर्चा नैवेद्य करून तिसऱ्या दिवशी (तृतीयेस) रात्री पालखी मोरगावी पोहचते. मोरगावकर छबिना घेऊन श्रींच्या पालखीस सामोरे येतात, यावेळी श्री देव महाराज श्री मंगलमूर्तींना गळ्यात धारण करतात. यावेळी सर्वाना श्रींचा ओलांडा मिळतो, व गावकरी श्रींना मोठ्या थाटाने गावात मिरवीत मंदिरात घेऊन जातात. मिरवणुकीने येऊन श्री मंगलमूर्ती व श्री मयुरेश्वर यांची भेट होते. धूळदर्शन वगैरे झाल्यावर श्रींना ओवरीत ठेवतात.

           चतुर्थीला कऱ्हा नदीमध्ये श्रीमंगलमूर्तींना स्नानासाठी नेतात. श्री मंगलमूर्तींच्या स्नानाचे तीर्थ श्री देव महाराज सर्व भक्तांच्या अंगावर शिंपडतात. भक्तही कऱ्हेत स्नान करुन ओलेत्याने ते अंगावर घेण्यात धन्यता मानतात. यानंतर मयूरेश्वराच्या मूर्तीसह श्रीमंगलमूर्तींची महापूजा होते. त्या वेळी धोतरजोड़ा व महादक्षिणा श्रींच्या चरणी अर्पण करतात. नंतर महानैवेद्य होऊन सर्वांस प्रसाद वाटप होते. रात्री मयुरेश्वराच्या समोरच्या मंडपात मोठ्या धुपारतीचे गायन केले जाते. त्या वेळी नित्याची एकवीस पदे म्हटली जातात. धूपारती झाल्यावर सर्वांना डाळीची खिरापत वाटतात.

          पंचमीच्या दिवशी सकाळी ओवरीत ठेवलेल्या श्रीमंगलमूर्तीपुढे धुपारती व टिपऱ्यांचा खेळ होतो. सिद्धिबुद्धिसहित श्रीमंगलमूर्तीस पालखीत घालून नदीच्या पलीकडे पवळीत नेतात. पंचमीला श्रीस्वारी देवस्थानच्या वाड्यात नेतात. तेथे पूजा नैवेद्य होऊन सर्वांना भोजन प्रसाद मिळतो. आजूबाजूच्या गावातून हजारो भक्त प्रसाद घेण्यासाठी येतात. हा समारंभ फारच प्रेक्षणीय असतो.

          श्रीमंगलमूर्तींची स्वारी षष्ठीस मोरगावहून निघते. येताना षष्ठीस जेजूरीचे खंडेराय व सप्तमीस शिवरीची यमाई या देवांची दर्शने श्रीमंगलमूर्तीस पुढे ठेवून घेतात. सप्तमीस सासवड येथे श्रीनारायणमहाराज ( थोरले) यांची पुण्यतिथि साजरी होते. तेथून पुण्यास मुक्काम करून श्रीमंगलमूर्ती दशमीस रात्री चिंचवड येथे जातात. या यात्रेत दशमीस चिंचवड येथे परत पोहोचावे लागते. पालखी चिंचवडजवळ येताच गावकरी मंडळी श्रीमंगलमूर्तीस वाजत गाजत गावात आणतात. जाता येता ठिकठिकाणी स्थानिक लोक पालखीचा सत्कार करतात.

श्री क्षेत्र चिंचवड येथील विजयादशमी / दसरा

          अश्विन शुद्ध दशमी रोजी सायंकाळी श्रींच्या भोगमूर्तीची पालखी घेऊन श्री देव महाराज व इतर ग्रामस्थ सीमोल्लंघनासाठी जातात. त्यावेळी पालखीबरोबर शास्त्री, आश्रित गणमंडळी भाऊबंद व इतर गावकरी असतात तसेच पालखीबरोबर वाजंत्री, छत्रधारी, चवऱ्या, दिवटीवाले इत्यादी सरंजाम असतो. श्री देव महाराजांनी हातात बीछवा घेतलेला असतो. पालखी बरोबर सर्व लोक गावाच्या वेशीबाहेर कामदा सोसायटी येथे, दसरा मैदानावर जातात.

          तेथे श्री देव महाराज विधीवत आपट्याच्या पानांचे पूजन करतात. यानंतर सर्व ग्रामस्थ सोने लुटतात. यानंतर पालखी श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरात परतते. यानंतर श्री देव महाराज श्री मंगलमूर्ती वाडा येथे बळीराणा करतात, श्री देव महाराजांच्या पत्नी सर्वांना औक्षण करतात, श्री देव महाराज सर्वाना सोने देतात.     

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव

          श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांनी आपले अवतार कार्य संपवून मार्गशीर्ष वद्य षष्ठी, इ.स. १५६१ रोजी वयाच्या १८६ व्या वर्षी पवना तटी योगमार्गाने संजीवन समाधी घेतली. श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांचा संजीवन समाधी महोत्सव हा चिंचवड संस्थानचा सगळ्यात मोठा उत्सव! मार्गशीर्ष वद्य द्वितीयेपासून षष्ठीपर्यंत चिंचवडमध्ये फारच धामधूम चालू असते. उत्सव काळात लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. संजीवन समाधी दिनाच्या दिवशी लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. दिव्यांची आरास केली जाते. उत्सव काळात सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक, वैद्यकीय, समाज प्रबोधनपर अनेक कार्यक्रम देवस्थान तर्फे आयोजित केले जातात. तसेच भजन-कीर्तन, व गायन यांनी परिसर दुमदुमून जातो.

          उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे सनई चौघडा वादनाने सुरुवात होते, व सायंकाळी  महोत्सवाचे उद्घाटन मान्यवर व्यक्तींच्या हस्ते होते. याच दिवशीपासून विविध योग – याग इ. ना प्रारंभ होतो. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मान्यवर कलाकार आपली कला श्री मोरया चरणी  सादर करतात, व विविध आरोग्य शिबिरांचे तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री मोरया गोसावी महाराज पुरस्कार सोहळा पार पडतो, यावेळी विविध सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींना श्री मोरया गोसावी महाराज पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून दाखविलेल्या व्यक्तीला श्री मोरया जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो.

          श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधीदिनी श्री देव महाराज त्यांच्या संजीवन समाधीस अभिषेक करतात. व दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.  लाखो भाविक  या महाप्रसादाचा लाभ घेतात. श्रीमोरया गोसावी महाराज, श्री चिंतामणी महाराज देव, श्री धरणीधर महाराज देव  यांनी पदे रचली आहेत. ही पदे विशेष प्रसंगी म्हणण्याची प्रथा आहे. या पदांच्या गायनाला धूपारती म्हणतात. या धुपारतीचे शास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे. या एकवीस पदांची धुपारती श्री मोरया गोसावी महाराजांच्या समाधी समोर रात्री गायली जाते. यानंतर श्री मंगलमूर्ती वाडा येथे धूपारती होऊन उत्सवाची सांगता होते.

सत्पुरुषांच्या पुण्यतिथी व अन्य उत्सव

पौष वद्य चतुर्थीला श्री चिंतामणी महाराज देव (थोरले) यांची पुण्यतिथी असते. त्याही वेळी एक दिवसाचा सोहळा आयोजित केला जातो. श्री चिंतामणी महाराज यांच्या समाधी मंदिरा समोर नारदीय कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. भाद्रपद शुद्ध सप्तमीला श्रीनारायण महाराज देव (थोरले) यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यावेळी देव यात्रेत असतात. सासवडला ही पुण्यतिथी साजरी होते. आषाढ शुद्ध चतुर्थीला श्री चिंतामणी महाराज देव (दुसरे) यांची पुण्यतिथि साजरी करण्यात येते. भाद्रपद कृष्ण तृतीयेस श्री धरणीधर महाराज देव (दुसरे) (दत्तक ) यांची पुण्यतिथि साजरी केली जाते. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधीस व श्री मंगलमूर्तींना विविध रुपात पूजा बांधण्यात येते व पोशाख करण्यात येतो. यामध्ये आंबा महोत्सव, मोगरा महोत्सव, चंदन उटी सोहळा, दवणा महोत्सव, द्राक्ष महोत्सव, शहाळे महोत्सव, तसेच त्रिपुरारी पौर्णिमेस देवांना दिव्याची आरास करण्यात येते. चैत्र महिन्यात श्री मंगलमुर्ती वाडा येथे चैत्रागौरीचे हळदी कुंकू आयोजित करण्यात येते. होलिका दहन देखील करण्यात येते. श्री मंगलमूर्ती वाडा येथील वेदपाठशाळेत सरस्वती पूजन करण्यात येते. गंगा दशहरा वेळी श्री देव महाराज पवना नदीचे पूजन करतात. श्रावण महिन्यात श्री मंगलमूर्तींसमोर रोज ५ पदाची आरती असते. दिवाळीच्या वेळी  देवांना भरजरी वस्त्रे व पारंपारिक अलंकाराने सजवले जाते.

chinchwad-leave-img-divider
मराठी english