श्री धरणीधर महाराजांनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री नारायण महाराज (दुसरे) हे शके १६९४ मध्ये गादीवर आले. त्यांचा जन्म शके १६६७ मध्ये झाला. त्यांच्या पत्नीचे नाव आबई असे होते. त्यांना चिंतामणी नावाचा एक मुलगा होता. श्री नारायण महाराज (दुसरे) हे थोर साक्षात्कारी सत्पुरुष होते. त्यांना सिद्धी अनुकूल होत्या.
एकदा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी इंग्रजांवर स्वारी करण्याचे ठरविले त्यावेळी नाना फडणवीस व सखारामबापू यांच्यासह ओझर येथे श्रींच्या दर्शनास गेले. त्यावेळी श्रींनी प्रसाद व आशीर्वाद दिला की, “तुम्ही विजयी व्हाल.” त्याप्रमाणे युद्धात श्रीमंत माधवराव पेशवे विजयी झाले. परत येताना त्यांनी श्रींचे दर्शन घेतले व संस्थानला गाव इनाम करून दिले. ते अद्याप त्यांच्या वंशजांकडे चालू आहे. श्री नारायण महाराज यांनी इ.स. १८०२ मध्ये मार्गशीर्षात आपला देह ठेवला.