श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांनी आपले अवतार कार्य संपवून मार्गशीर्ष वद्य षष्ठी, इ.स. १५६१ रोजी पवना तटी योगमार्गाने संजीवन समाधी घेतली. त्यानंतर त्यांची परंपरा त्यांचे सुपुत्र श्रीचिंतामणी महाराज यांनी चालविली. श्रीचिंतामणी महाराजांचा जन्म इ.स. १४८१ मध्ये झाला. श्री मोरया गोसावी समाधिस्थ झाले, त्या वेळी श्री चिंतामणी महाजांचे वय ८० वर्षाचे होते. चिंतामणी महाराज देखील श्री मोरया गोसावी महाराजांप्रमाणेच थोर गाणपत्य व अधिकारी पुरुष होते. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. त्या सिद्धीच्या जोरावर त्यांनी अनेक भक्तांची दुःखे दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या व त्यांना भक्तिमार्गाला लावले. वडिलांप्रमाणेच तेही अत्यंत विरक्त होते. आठव्या वर्षी श्री मोरया गोसावी महाराजांनी श्री चिंतामणींची मुंज केली, त्या वेळी चिंतामणींची गायत्रीमंत्राचा उपदेश केला. गायत्रीमंत्राबरोबरच श्री मोरया महाराजांनी त्यांना सूर्योपासना व गणेशोपासनेचा उपदेश केला. नंतर गुरुगृही जाऊन श्री चिंतामणी महाराजांनी वेदाध्ययन पूर्ण केल्यावर त्यांनी यथाविधि गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत त्यांनी मोरया गोसावीच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मसाधना केली. श्रीमोरया गोसावी हेच त्यांचे मोक्षगुरु होते. वयाच्या १२० व्या वर्षी म्हणजेच इ.स. १६०१ मध्ये त्यांना पुत्रप्राप्ती झाली. मुलाचे नाव ‘नारायण’ असे ठेवले. एके दिवशी चिंतामणी महाराजांना भेटायला म्हणून तुकाराम महाराज व समर्थ रामदास स्वामी आले होते. महाराजांनी त्यांचे स्वागत केले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर चिंतामणी महाराजांनी त्यांना भोजन प्रसादाचा आग्रह केला. तुकाराम महाराजांनी व समर्थांनी आपल्याजवळ आणखी दोन पाने मांडायला सागितली. सर्वजण जेवायला बसले.
तुकाराम महाराज चिंतामणी महाराजांना म्हणाले की, “मी विठ्ठल-रखुमाईला बोलावतो.” समर्थ रामदास म्हणाले, “मी श्रीराम व सीतामातेला बोलावतो.”
सर्वजण जेवायला बसले. आवाहन करताच पांडुरंग – रुक्मिणी, श्रीराम – जानकी प्रसादास आले. त्या वेळी तुकाराम महाराज चिंतामणी महाराजांना म्हणाले, “आता आपण गणपतीला जेवायला बोलवावे.”
चिंतामणी महाराजांनी गणपतीचे ध्यान करून त्यांना आवाहन केले, आणि चिंतामणी महाराजच साक्षात गणपती झाले. सर्वांना त्यांचे अंगी गणपतीची मूर्ती दिसू लागली, त्यांना सोंड आली होती, मस्तकावर सोन्याचा रत्नजडित मुकुट होता. त्यावर दूर्वांकुर शोभा देत होते. चार हातात पाश अंकुश इत्यादि आयुधे शोभत होती. त्यांनी लाल रंगाचे वस्त्र नेसले होते. एकदंतामुळे त्यांची शोभा द्विगुणित झाली होती. एका हातात ब्रह्मरसाचा मोदक होता व दुसरा हात अभयमुद्रेत होता. श्री चिंतामणी महाराजांना अशा तेजस्वी गणपती रुपात पाहून, देव व भक्ताचे ते अद्वैत रूप पाहून, सर्वजण नतमस्तक झाले. तुकाराम महाराजांनी श्री चिंतामणी महाराजांची स्तुती केली. ते स्तुतिपर पाच अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आढळतात. चिंतामणी महाराज मात्र अद्वैत अवस्थेला पोचले होते. गणपती व ते एकच होते. तुकाराम महाराज म्हणाले, “तुम्ही तर प्रत्यक्ष देवच आहात. आजपासून लोक तुम्हाला ‘देव’ म्हणतील” आणि तेव्हापासून चिंतामणी महाराजांचे शाळिग्राम आडनाव मागे पडून देव हे आडनाव रुढ झाले.
आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांना देखील संजीवन समाधी घेण्याची इच्छा होती, परंतु श्री मोरया गोसावी महाराजांनी त्यांना दृष्टांत देऊन तसे न करण्यास सांगितले. आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी आपला निर्णय बदलला. त्यांनी आपल्या समाधीसाठी श्री मोरया गोसावी महाराजांच्या समाधी शेजारीच एक गुहा तयार करवून घेतली होती व आपल्या मुलास सांगितले की, “माझ्या मृत्यूनंतर माझे दहन याच गुहेत करावे.” त्यानुसार ज्यावेळी त्यांच्या देहाचे दहन करण्यात आले, त्यावेळी त्याजागेवर श्री गणेशाची प्रतिमा उमटली. ती आजही आपल्याला पहावयास मिळते.
© 2024 Chinchwad Deosthan Trust : Chinchwad. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper