परंपरा

chinchwad-home-banner-after-img

इतर सत्पुरुष

गुरु नयनभारती गोसावी महाराज

chinchwad-nayan-bharti-gosavi-img

श्री मोरया महाराज जेव्हा पाच वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या जिवावरील मोठे गंडांतर टळले. गावात तापाची साथ सुरू होती. त्या तापाने श्री मोरयाला गाठले. आईवडिलांनी खूप प्रयत्न केले. पण यश आले नाही. ज्या पुत्रासाठी आपण मोरेश्वराची अनेक वर्षे तपश्चर्या केली, तो पुत्रच आता हाती लागत नाही, असे समजून वामनभटांनी मोरेश्वराची प्रार्थना करण्यास सुरवात केली. थोड्याच वेळात एक गोसावी आला आणि मोरयाच्या बिछान्याजवळ येऊन तो म्हणाला, ‘देवा, हे काय?, अजून तुम्हाला अवतारकार्य पूर्ण करायचं आहे आणि इतक्यात काय चाललात?’ त्या गोसाव्याने आपल्या झोळीतील अंगारा मोरयाच्या कपाळाला लावला. त्या गोसाव्याचा स्पर्श होताच मोरया झोपेतून जागे व्हावे, त्याप्रमाणे ताडकन् उठून बसला. त्याने हात वर केला. तो गोसावी मोरयाच्या बिछान्यावर बसला व त्याने मोरयाच्या कानात गुरुमंत्र सांगितला. त्याला कफनी, रुद्राक्षाची माळ दिली. जाताना त्या गोसाव्याने वामन भटांना सांगितले, ‘तुम्ही अजिबात काळजी करू नका.’ अशाप्रकारे श्री मोरयांना जीवनदान देणारे होते ते चौदाव्या आखाड्याचे फिरस्ते गोसावी, योगिराज श्री नयनभारती महाराज. श्री मोरयांच्या मनात विचार येई, की आपल्याला कोणीतरी सद्गुरू भेटावा. मोक्षगुरु भेटावा, सद्गुरूशिवाय साधना मफल होत नाही, सद्गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. मिळेल का मला सद्गुरू ? मनाची व्याकुळता दिवसेंदिवस वाढत होती.

एके दिवस सकाळी मयूरेश्वराची षोडशोपचारे पूजा करून मोरया गोसावी घरी निघाले होते. एवढ्यात बाहेरच्या ओवरीत त्यांना एक दिव्यमूर्ती दिसली. माथ्यावर जटाभार, मस्तकावर त्रिपुंड्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ, अंगात भगवी कफनी व पायात खडावा. अशी दिव्य मूर्ती पाहताच मोरया गोसावींचे पाय थबकले, मन विरघळू लागले. दोघांची दृष्टादृष्ट झाली. हृदयाचे संकेत हृदयाला कळले. धावत जाऊन मोरया गोसावींनी त्या साधूंचे पाय घट्ट धरले. विरघळलेल्या मनाच्या गंगा यमुना डोळ्यातून वाहू लागल्या. त्यांनी सद्गुरुचरणांना स्नान घातले. मोरया गोसावी म्हणाले, ‘महाराज माझ्यावर कृपा करा, मला अनुग्रह द्या. शिष्य म्हणून माझा स्वीकार करा. ‘त्या साधूंनी मोरयांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला व तो साधू म्हणाला, ‘ जा, आजपासून तू सनाथ झालास. मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे.’ या शब्दांनी मोरया गोसावींना अवर्णनीय आनंद झाला.  नयनभारतींनी मोरया गोसावींना मंत्रोपदेश केला, ध्यानधारणादि योगसाधन शिकवले, षट्क्रि‍या, कुण्डलिनी जागृति, षट्चक्रभेदन समाधी अशा स्वरूपाचा संपूर्ण हठयोग शिकविला व आज्ञा केली की, “आता तू थेऊर क्षेत्री जाऊन तप कर. आम्हीही तीर्थयात्रेला जातो.” सद्गुरूंचा विरह होणार या कल्पनेने मोरया गोसावींना अत्यंत दुःख झाले. ते म्हणाले, “महाराज तीर्थयात्रेला जाताना मला बरोबर घ्या. मी आपली सेवा करीन. माझी सेवा करण्याचा इच्छा अपुरी राहिली आहे.” नयनभारती म्हणाले, “अरे तू तीर्थयात्रेला येऊ नकोस. प्रवासात साधनेत अनेक अडथळे येतात. आता तुला माझी सेवाच जर करायची असेल तर थेऊरच्या चिंतामणीची सेवा कर.” जड अंतःकरणाने मोरया गोसावींनी सद्गुरू नयनभारतींचा निरोप घेतला. निघताना मोरया गोसावींनी विचारले, “आता आपली पुनः भेट केव्हा होईल ?” नयनभारती म्हणाले, “तू जेव्हा दर्शनाच्या इच्छेने स्मरण करशील, त्यावेळी मी तुला दर्शन देईन. काही वर्षांनी आयुष्याच्या उत्तरार्धात मी तुला चिंचवड येथे दर्शन देईन.” असा आशीर्वाद देत योगिराज नयनभारती निघून गेले. अश्रुपूर्ण नेत्रांनी मोरया गोसावींनी त्यांना निरोप दिला.

श्री मोरया गोसावी आता आपले आयुष्य मंगलमूर्तींच्या उपासनेत घालवीत असत. एक दिवस मोरया गोसावींना आपल्या गुरुंची नयनभारतींची आठवण झाली. श्री मोरया गोसावींनी भेटण्याच्या इच्छेने तीव्रतेने गुरुंचे स्मरण केले. श्री मोरया गोसावींनी प्रेमाने दंडवत घातले व प्रार्थना केली, “महाराज, आता आपण चिंचवड क्षेत्रीच रहावे. मलाही आपले नित्य दर्शन होईल व गुरुसेवाही करता येईल.” त्यांनी मोरयांची प्रार्थना मान्य केली व चिंचवडला राहिले. मोरया गोसावींची गुरुसेवेची इच्छाही पूर्ण झाली. नंतर ई.स. १५५९ मध्ये नयनभारती यांचे महानिर्वाण झाले.

chinchwad-leave-img-divider
मराठी english