श्रीमंगलमूर्ती

chinchwad-home-banner-after-img
chinchwad-shri-mangalmurti-left-img

श्री मंगलमूर्तींची माहिती

चिंचवड ते मोरगाव यात्रा करताना, एकदा श्री मोरयांना मोरगावास पोहोचायला उशीर झाला. मंदिराचे दार पूजाऱ्यांनी बंद केले होते. श्री मोरया तिथेच असलेल्या तरटीच्या झाडाखाली बसून व्याकूळ होऊन मयूरेश्वरचा धावा करू लागले, त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. 
                                   “तुझीये भेटीची बहू आस रे मोरया, देखीता बहुत झाले दिवस रे मोरया” 
असा धावा त्यांनी करायला सुरुवात केली,  हा धावा मयूरेश्वराने ऐकला व पालनहार श्री मयूरेश्वर मोरयांच्या समोर प्रकट झाले व मोरयांना म्हणाले, “अरे मोरया, कशासाठी एवढा अट्टाहास करतोस, आपल्यातले द्वैत संपले आहे. आपल्या दोघांमध्ये कोणताच भेद उरलेला नाही. तू आणि मी एकच आहोत”, असे म्हणून श्री मयुरेश्वर अंतर्धान पावले. एकदा श्रीमोरया गोसावी नेहमीप्रमाणे यात्रेसाठी मोरगावला गेले. देवळात श्रीमयूरेश्वराचे ध्यान करीत असता सिद्धिबुद्धिसहित श्रीमयूरेश्वराची मूर्ती त्यांच्या पुढे उभी राहिली. ते तेजस्वी ध्यान पाहताच मोरया गोसावींना अतिशय आनंद झाला, व त्यांनी श्रीमयूरेश्वरांचरणी साष्टांग दंडवत घातले. त्यांना उठवून श्रीमयूरेश्वरांनी सांगितले की, “आता तू वृद्ध झालास, यात्रेस येताना तुझे फार हाल होतात. ते हाल मला पहावत नाहीत. तुझी यात्रा मला पावली. यापुढे तू मोरगावास यात्रेला येऊ नकोस.” 

“आता मीच तुझ्यासोबत चिंचवडला येतो. उद्या गणेशकुंडात स्नान करताना तुला तेजस्वी, शेंदरी रंगाचा एक तांदळा मिळेल. ते माझेच स्वरूप आहे, तो तांदळा घेऊन चिंचवडला जा. या नंतर तो तांदळा घेऊन फक्त भाद्रपद, माघ महिन्याच्या शुद्ध चतुर्थीसच वारीस येत जा. मी आता तुझ्याजवळच आहे. आता तू आणि मी वेगळे नाही. तुझ्या भक्तीमुळे आपल्यातील द्वैत आता नष्ट झालेले आहे.” असा आशीर्वाद देऊन श्रीमयूरेश्वर अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी मोरया गोसावींनी कऱ्हा नदीमधल्या गणेशकुंडात स्नान केले. स्नानानंतर सूर्याला दुसरे अर्घ्य देत असताना तांदळारूपी श्रीमंगलमूर्ती श्रीमोरयांच्या हातात प्रकट झाले, आणि त्याचवेळी आकाशवाणी झाली, “हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की, भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील” आणि तेव्हा पासून, “मंगलमूर्ती मोरया” हा जयघोष प्रचलित झाला. श्रीमन् महासाधु श्री मोरया गोसावी महाराजांना श्री मंगलमूर्तींची प्राप्तीची  ही घटना इ.स १४८९ मध्ये घडली. नंतर मोठ्या समारंभाने मोरया गोसावींनी ती प्रसादमूर्ती (तांदळा) श्रीमयुरेश्वरांच्या मंदिरात आणली. ती प्रसादमूर्ती मयुरेश्वरांपुढे ठेवून आर्त भावनेंने प्रार्थना केली. त्या वेळी सर्वांच्या देखत श्री मयुरेश्वराच्या गळ्यातील हार मोरया गोसावींच्या गळ्यात पडला.  भजन करीत करीत श्री मोरया गोसावी महाराज ती प्रसादमूर्ती घेऊन श्री क्षेत्र चिंचवडला आले. दुसऱ्या दिवशी त्या मूर्तीची श्री कोठारेश्वरासमोर शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा केली. पूर्वी आकाराने लहान असलेली ही मूर्ती शेंदूर लेपनाने आता मोठी झालेली आहे. श्री मंगलमूर्तींची स्थापना लाकडी गाभाऱ्यात केली असून, पितळी मखरात बसविण्यात आली आहे. साक्षात मोरगावच्या मयुरेश्वराचा अंश असलेली हीच प्रसादमूर्ती सध्या चिंचवडच्या श्रीमंगलमूर्ती वाड्यात (देऊळवाड्यात/ देव वाड्यात) दर्शनास आहे.

श्री कोठारेश्वरांची माहिती

मंगलमूर्ती वाड्यामध्ये श्रीमंगलमूर्तींच्या जवळ उत्तराभिमुख श्रीकोठारेश्वर गणपतीची मूर्ती आहे. या गणेशाची स्थापना स्वतःश्री मोरया गोसावी महाराज यांनी केलेली आहे. श्री मोरया गोसावी महाराज पार्थिव (मातीच्या) गणेशाची पूजा करून ज्या जागेवर विसर्जन करीत, त्या जागी ही मूर्ती स्थापन केली गेली. श्रीमोरया गोसावी महाराजांना श्रीमंगलमूर्तींची प्राप्ती झाल्यावर त्यांची स्थापना श्री कोठारेश्वरासमोर केलेली होती. त्यामुळे ह्या दोन मूर्त्यांमध्ये पडदा बांधण्यात येत असे. एरवी श्री कोठारेश्वराची नित्य पूजा पडद्यामागील बाजूस होत असे.  कोठारेश्वराचे दर्शन, श्री मंगलमूर्ती भाद्रपद किंवा माघ यात्रेस गेल्यावर अथवा  श्री कोठारेश्वर वर्धापनदिनी होत असे. मोठ्या लाकडी मंडपात गाभारा बांधून श्रीमंगलमूर्तीची स्वारी आता त्या गाभाऱ्यात विराजमान झालेली आहे. कोठारेश्वरापुढे  प्रशस्त मंडप बांधण्यात आला आहे. त्यामुळे कोठारेश्वराचे आणि श्रीमंगलमूर्तीचे असे दोघांचेही दर्शन नित्य होते. श्री मंगलमूर्तींची स्थापना सध्याच्या सभामंडपात झाल्यानंतर श्रीकोठारेश्वराचे नित्य दर्शन होते. श्री नारायण महाराज देव यांच्या काळात देवस्थानला भव्य रूप प्राप्त झाले होते, त्यावेळी श्री कोठारेश्वर गणपतीच्या मागे धान्याचे कोठार देखील बांधण्यात आले होते. श्रावण शुद्ध षष्ठीला श्रीकोठारेश्वरांचा वर्धापनदिन साजरा केला जातो, त्यावेळी श्री मोरया गोसावी महाराज यांनी रचलेली पदे श्री कोठारेश्वरासमोर गायली जातात. 

chinchwad-leave-img-divider
मराठी english