क्षेत्रमाहात्म्य

chinchwad-home-banner-after-img

श्रीमंगलमूर्ती वाडा

           श्रीमन् महासाधु श्री मोरया गोसावी महाराजांच्या व सप्त पुरुषांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर तेथूनच जवळ चिंचवड देवस्थान ट्रस्ट (श्री स्वामी संस्थान) यांचा श्री मंगलमूर्ती वाडा आहे. या वाड्यास देऊळ वाडा व देव वाडा असे देखील म्हटले जाते. या वाड्यात श्री मोरया गोसावी महाराजांना मोरगावच्या श्री मयुरेश्वराने आशिर्वाद दिल्याप्रमाणे कऱ्हा नदीत स्नान करत असताना प्राप्त झालेले श्री मंगलमूर्ती (तांदळा) सिंहासनावर विराजमान आहेत. श्री मंगलमूर्तींच्या जवळ उत्तराभिमुख असणाऱ्या श्री कोठारेश्वर गणपतीची मूर्ती आहे या मूर्तीची स्थापना स्वतः श्री मोरया गोसावी महाराजांनी केलेली आहे. श्री कोठारेश्वराच्या समोरच शमीचे पुरातन असे झाड आहे. श्री मंगलमूर्तींसमोर प्रशस्त असा सभामंडप आहे. या सभामंडपाचे लाकूडकाम अत्यंत देखणे आहे. या सभामंडपात सुंदर अश्या हंड्या व झुंबरे टांगलेली आहेत. तसेच अष्टविनायकांच्या मोठ्या तसबीरी सुद्धा लावलेल्या आहेत. श्री मंगलमूर्ती वाड्यात पुरातन काळातील भांडी आहेत, तसेच पुरातन कालीन वाडा संस्कृतीचे दर्शन घडते. चिंचवड देवस्थान तर्फे मंगलमूर्ती वाड्यामध्ये गोशाळा बांधली असून तेथे अनेक गाईंचे संगोपन केले जाते. वाड्याचे बांधकाम हे अत्यंत ऐतिहासिक अशा पद्धतीचे असून स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून त्या वास्तूकडे पाहिले जाते. 

           श्री मंगलमूर्ती वाड्यात चिंचवड येथील पेटा कार्यालयाची कोठी (कोठार) असून सभामंडपाच्या वरील मजल्यावर श्री मोरया गोसावी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांचे तसेच लीलांचे  तैलचित्र प्रदर्शन आहे. श्री मंगलमूर्ती वाड्यात चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे वेदपाठशाळा चालवली जाते या वेदपाठशाळेत अनेक विद्यार्थ्यांना वैदिक शिक्षण विनामूल्य दिले जाते. या वाड्यात श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्यानंतर गादीवर बसणारे महाराज आजही रहातात. असा हा वाडा अत्यंत प्रशस्त आहे.  

           ह्या वाड्यात छत्रपती श्रीशिवाजी महाराज बालपणी अनेकवेळा येऊन गेले होते. तसेच राजमाता जिजाऊ यांनी नवसपूर्ती म्हणून श्रीमंगलमूर्तींना पुतळ्याची माळ, नवरत्नांचा हार व अन्य दागिने अर्पण केले होते. आजही  श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवात हे दागिने श्रीमंगलमूर्तींना घालण्यात येतात. या वाड्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी व इतर अनेक संत महात्मे देखील येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. या वाड्याचा काही भाग श्रीचिंतामणी महाराज यांच्या काळात बांधण्यात आला आहे, व  काही भाग नाना फडणवीस आणि हरीपंत फडके यांनी बांधलेला आहे. 

           श्री मंगलमूर्ती वाड्यातून श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर येथे जाणारे भुयार आहे. मुघल काळात नैवेद्य दाखवण्यास जाताना काही विघ्ने येऊ नयेत यासाठी नैवेद्य भुयारातून नेण्यात येत असे. या वाड्यातून आत गेल्यावर डाव्या हाताला सभामंडपासमोर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे कार्यालय आहे. या कार्यालयातून चिंचवड, मोरगाव, थेऊर, सिद्धटेक व नारंगी या क्षेत्राचा कारभार पहिला जातो. 

chinchwad-leave-img-divider
मराठी english